Friday, 28 February 2020

मलेरिया आख्यान भाग १- प्लाझ्मोडिअम-अदृश्य भागीदार

नमस्कार🙏
आज विज्ञानदिन....आजचा दिवस साधून लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न तुमच्यासमोर मांडतेय. विज्ञानातील रंजक पण क्लीष्ट माहिती सोप्या शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचावी हा हेतू ...आणि यासाठी मी निवडलाय माझा आवडता विषय 'मलेरिया'.

भाग १: प्लाझ्मोडिअम-अदृश्य भागीदार

मलेरिया (हिवताप) हा विषय तसा काही नवीन नाही. आपल्या आजूबाजूला कधी ना कधी, कोणा ना कोणाला झालेला दिसतो किंवा पावसाळ्याअखेरीस काहीतरी आकडेवारी कानावर पडते, यावर्षी किती रोगी आढळले, त्यातले किती दगावले, प्रतिबंधात्मक उपाययोजना कशी करावी यावर संदेश दिले जातात, परिपत्रके छापली जातात वगैरे वगैरे.... मी तुम्हाला यासंदर्भातील थोडी शास्त्रीय पण गमतीदार माहिती सांगणार आहे.


सर्वसाधारणपणे डास चावल्यामुळे मलेरिया होतो हे सर्वानाच माहित आहे. पण खरं तर डास हे फक्त वाहक आहेत. मलेरिया आजार डासांच्या शरीरातील 'प्लाझ्मोडिअम' जातीच्या परजीवी म्हणजेच पॅरासाईटमुळे होतो. पॅरासाईट, बॅक्टरीआ आणि व्हायरस हे सर्व वेगळे बरं का! सध्या कोरोना व्हायरस प्रकरण ताजं आहे. प्राण्यांच्या वर्गवारीत हे सर्व वेगवेगळ्या गटात मोडतात. प्रत्येकाची रचना आणि कार्यप्रणाली वेगळी असते.
या मलेरिया आजाराच्या कर्ता करवित्या प्लाझ्मोडिअमवर जवळपास एक दशक संशोधन आणि सखोल अभ्यास केल्याने मला तर याची भुरळच पडली आहे. हा प्लास्मोडिअम खूप विस्मयकारी आहे बरं का! ह्याला जगण्यासाठी दुसऱ्या प्राण्यांमध्ये राहायची गरज पडते. स्वतःचे असे अस्तित्वच नाही. बरं एका प्राण्यात शिरून तिथे सुखाने राहायचं.... तर नाही, या महाशयांना जीवनचक्र पूर्ण करायला दोन प्राण्यांची (होस्टची) गरज पडते. म्हणजे दोन होस्टमधून संक्रमण झाल्याशिवाय ही प्रजाती वाढूच शकत नाही. त्यातील एक होस्ट म्हणजे कीटक वर्गातील डास आणि दुसरा म्हणजे पृष्ठवंशीय प्राण्यांमधील विविध गट उदाहरणार्थ सरपटणारे प्राणी, पक्षी, सस्तन प्राणी (उंदीर, माकड, माणूस इत्यादी). म्हणजे फक्त माणसालाच नाही तर या सर्वाना मलेरिया होतो.
अजून एक महत्वाची गोष्ट, सामान्यतः आपल्याला असं वाटतं की रक्त हेच डासांचं खाद्य आहे पण ते पूर्णतः चुकीचं आहे. डास फुलांमधील मध, झाडांचा रस शोषून आपलं पोट भरतात; फक्त मादी डासांना त्यांच्या अंडी घालण्याच्या सुमारास रक्तातील प्रथिने आणि इतर पोषणद्रव्यांची गरज पडते. म्हणजे जे आपल्याला चावतात ते सर्व मादी डास असतात आणि त्यातील काही मलेरिया व इतर जंतूंचा प्रसार करतात. विशिष्ट प्रजातीच विशिष्ट रोग पसरवतात. मलेरियाचे पॅरासाईट्स (प्लाझ्मोडिअम) अॅनोफेलिस डासाच्या मादीकडून पसरवले जातात. अजून उदाहरणं द्यायची झाली तर क्युलेक्स प्रजातीमुळे हत्तीरोगाचे जंतू पसरतात, एडिस इजिप्ती प्रजातीमुळे डेंग्यू, चिकनगुनिआ , झिका या आजारांचे विषाणू पसरतात.
मलेरियाचा प्रसार डासांमुळे होतो हे ब्रिटीश आर्मी डॉक्टर 
सर रोनॉल्ड रॉस यांनी शोधून काढले आणि त्यासाठी त्यांना १९०२ साली नोबेल पारितोषिक पण मिळाले. महत्वाची गोष्ट ही, की त्यांनी हा शोध भारतात लावला. 'मान्सून ऋतूमध्ये बळावणारा मलेरियाचा प्रादुर्भाव' यावर त्यांचे संशोधन चालू होते. या मोसमात डासांचे प्रजनन होण्यास पूरक वातावरण निर्माण झाल्यामुळे मादी डासांना रक्तखाद्याची गरज पडते आणि डासांची संख्या पण वाढलेली दिसते. याच कारणास्तव उष्णकटिबंधीय म्हणजेच आफ्रिका खंड, दक्षिण अमेरिका, मध्य व दक्षिण आशिया यासारख्या प्रदेशात मलेरियाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो.
डास चावल्यावर त्याच्या लाळेतून प्लाझ्मोडियम पॅरासाईट्स शरीरात प्रवेश करतात आणि तिथे ते काय उच्छाद मांडतात हे पुढील भागात पाहू.
(फोटो स्रोत- गुगल)
वृषाली पाठक-गोरे (Ph.D.)

इतिहासाचे साक्षीदार - एक्सप्रेसवे एडिशन

३ तासांचा प्रवास १६ तास लांबल्यावर जेव्हा अखेरीस घर जवळ येत तेव्हा पुलंच्या शैलीत "आपल्या पोटात एक चिमुकले भांडे आहे आणि त्यात जीव नावा...