३ तासांचा प्रवास १६ तास लांबल्यावर जेव्हा अखेरीस घर जवळ येत तेव्हा पुलंच्या शैलीत "आपल्या पोटात एक चिमुकले भांडे आहे आणि त्यात जीव नावाची वस्तू पडल्यावर गार वाटते" या 'जीव भांड्यात पडणे' उक्तीची पुरेपूर अनुभूती घेतली.
३ फेब्रुवारी ला मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या आडोशी बोगद्याजवळ एक प्रोपेलिन गॅस टँकर उलटला आणि महाराष्ट्राने सर्वात मोठी वाहतूक कोंडी अनुभवली. अतिशय ज्वलनशील असलेल्या या गॅसमुळे प्रशासकीय यंत्रणांना परिस्थिती काळजीपूर्वक हाताळावी लागत होती. परिणामी २२ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हजारो प्रवासी आणि वाहनचालक अडकून पडले होते.
आम्ही ४ तारखेला दुपारी ४.३० ला निघून तब्बल १६ तासांनी सकाळी ८.३० वाजता डोंबिवलीला पोहोचलो. मधल्या कामशेत ते लोणावळा या फक्त १७-२० किमीच्या पट्ट्यासाठी १० तास गेले.
खरं तर मी आणि माझे कुटुंबीय अपघाताच्या दुसऱ्या दिवशी जवळपास २४ तास उलटून गेल्यावर निघालो होतो. आमच्या बस एजन्सीला (PinkBus) दोन तीनदा फोनवरून विचारपूस करून त्यांनी रस्ता सुरू असल्याची खात्री दिल्यामुळे तसेच पर्यायी मार्गांच्या उपलब्धतेमुळे आम्ही विश्वास टाकून निघालो. सुरुवात तर चांगली झाली पण कामशेतपासून जो ट्रॅफिक लागला तो पाठच सोडेना. गुगल वर नेहमीचे रस्ते पूर्ण बंद दाखत होते, फक्त ताम्हिणी घाटाचा रस्ता चालू होता तरीही ड्रायव्हर ने गाडी ओल्ड हायवेने घेतल्यामुळे विचारणा केल्यावर "सेठने जैसे बोला वैसे किया", "हम खुद भी परेशान है" अशी उत्तरं मिळाली. वर सेठचं तेच तुणतुणं, "रोड चालू है". संतप्त प्रवासी हवालदिल झाले होते. काहीना खूप भूक लागली होती. पुढील रस्त्याच्या परिस्थितीची काहीच कल्पना मिळत नव्हती. ११ वाजले तरी गाडी तिथेच होती. अधेमधे १० मीटर पुढे सरकारची परत 'जैसे थे'.
ड्रायव्हर-क्लिनर वर थोडं तोंडसुख घेऊन मीपण इतर पर्यायांचा विचार करू लागले. परत जाण्यासाठी एखादी OLA किंवा UBER मिळते का किंवा मुक्कामासाठी हायवेजवळच एखादे सुरक्षित हॉटेल सापडते का ते शोधत होते. माझ्यासोबत माझी लहान मुलं (२ वर्षे, ६ वर्षे) भाची (११ वर्षे) आणि इतर ३ सदस्य होते. दमल्यामुळे मुलं तर झोपली होती पण जागी झाल्यावर किती साथ देतील याची शाश्वती नव्हती. आम्ही खाऊचे डबे पाणी बरोबर घेतल्यामुळे खाण्यापिण्याचा काही त्रास नव्हता पण हे असं अधांतरी किती काळ राहणार काहीच कल्पना येत नव्हती. रात्री १२ वाजून गेले तरी कार्ला परिसरात अडकून पडलो होतो. सतत Google maps बघून अंदाज घेत होतो. Social media वर news आणि reels बघून पॅनिक होत होतो. मधे कधीतरी आम्ही सर्व महिला washroom च्या शोधात बाहेर पडलो. आजुबाजूच्या सर्व गाड्यांनी त्यांचे headlights बंद करून आमची सोय केली.
रात्रीच्या वेळी अवजड वाहने, ट्रक्स, टेम्पो हे आपापल्या गाड्या बंद करून तिथेच रस्त्यात झोपून गेलेले. बिचाऱ्या ड्रायव्हर-क्लिनर ने त्यांना उठवून उठवून गाड्या बाजूला घ्यायला लावल्या. अधेमधे wrong way घेवून थोडे अंतर पार केले आणि साधारण दीड वाजता लोणावळा टोल नाक्याआधी एका टपरीवर गाडी थांबवली. आमच्या मागे बऱ्याच गाड्या तिथे आल्या आणि खाण्यासाठी एकच झुंबड उडाली. आम्ही अक्षरशः तिथल्या माणसाच्या डोक्यावर बसून मुलांसाठी मॅगी करून घेतली. मागच्या एका हॉटेलमध्ये रूमची चौकशी पण केली पण शेवटी बसच सुरक्षित वाटली आणि निघालो पुढे. आता सर्वांनी परिस्थिती स्वीकारली होती. पेंगत पेंगत सर्वजण वाट बघत राहिले. मधे एक ठिकाणी पोलिसांची गाडी पुढे जाताना दिसली, रस्ता मोकळा करण्यासाठी आली असेल बहुदा.
शेवटी सकाळी ६ वाजता लोणावळा exit घेऊन घेऊन आम्ही एकदाचे एक्सप्रेसवेला लागलो. पूर्ण रस्ता मोकळा होत त्यामुळे जीवात जीव आला. रात्रभराचा मानसिक आणि शारीरिक शीण कमी होऊन हायसं वाटलं. अखेरीस आम्ही ८.३० वाजता मुक्कामी पोहोचलो आणि अशा प्रकारे या सर्वात मोठ्या वाहतूक कोंडीचे साक्षीदार झालो.
अर्थातच झालेला अपघात हा गंभीर स्वरूपाचा होता. हवेत मिसळलेल्या गॅसमुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. बोगद्याच्या दुसऱ्या बाजूला बारीक स्पार्क जरी झाला असता तरी ५ किलोमीटरचा परिसर उध्वस्त झाला असता. यात प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पोलिस, NDRF, आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय, गॅस कंपनी कर्मचारी, क्रेन वाले, फायर ब्रिगेड आणि बरेच अजून यांच्या प्रयत्नांनी ३३ तासांनंतर रस्ता मोकळा झाला.
पण या सगळ्यातून एक गोष्ट समोर येते की, अशा घातक केमिकल्सच्या दळणवळण नियमावलीत अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने काही बदल करण्याची आवश्यकता आहे का किंवा, अशा अपघातांसाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने काही विशेष कार्यपद्धती अवलंबली पाहिजे का जेणेकरून परिस्थिती लवकर आटोक्यात आणता येईल.
प्रशासन या गोष्टींचा नक्की विचार करेल ही आशा!

