Thursday, 23 April 2020

मलेरिया आख्यान भाग ३- मलेरिया निदान आणि उपचार

जागतिक सर्वेक्षणानुसार मलेरिया दर वर्षी अब्जावधी लोकांना होतो आणि त्यातील लाखो रुग्ण दगावतात. आफ्रिका खंड आणि दक्षिण आशियायी देशांमध्ये याचे प्रमाण खूप जास्त आहे. यामध्ये भारतातील काही प्रदेशाचाही समावेश आहे. आपण मागच्या भागात पॅरासाईट्सच्या प्रजातींबद्दल जाणून घेतले. सर्वाधिक मृत्यू फॅल्सीपॅरम प्रजातीमुळे होतो तर व्हायवॅक्समुळे सौम्य प्रकारचा मलेरिया होतो. अमेरिकन उपखंडात व्हायवॅक्स अधिक प्रमाणात आढळतो. आफ्रिका खंडात ९०% च्या वर फॅल्सीपॅरम मलेरियाचा प्रादुर्भाव दिसून येतो. याचमुळे एकट्या आफ्रिका खंडात मलेरियाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. २०१८ मध्ये ही आकडेवारी जवळपास ५ लाख होती (संदर्भ, WHO मलेरिया रिपोर्ट).
फॅल्सीपॅरम मलेरिया धोकादायक असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे या पॅरासाईटच्या वाढीचा वेग. फॅल्सीपॅरम परासाईट लिव्हरमधून बाहेर पडल्यावर रक्तात खूप वेगाने वाढतात आणि धोकादायक पातळी गाठतात. त्यामुळे मलेरियाची लक्षणे दिसून आल्यानंतर लवकरात लवकर उपचार करावे लागतात. थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी जीवावर बेतू शकते. मलेरियाची तीव्रता बऱ्याच अंशी पॅरासाईट्सचा प्रभावीपणा आणि माणसाची प्रतिकारशक्ती यावर अवलंबून असते. लाल रक्तपेशींवर हल्ला झाल्यानंतर आपल्या पांढऱ्या पेशी ते आक्रमण दूर करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच वेळी जर औषधांचे साहाय्य लाभले तर आजार बरा होऊ शकतो. पण जर प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर आजार लवकर बळावतो. फॅल्सीपॅरम पॅरासाईट्स खूप चलाख असतात, आपल्या पांढऱ्या पेशींचे आक्रमण चुकवण्यासाठी ते रक्तातून प्रवास करत आपल्या महत्वाच्या अवयवांमध्ये लपून बसतात आणि तेथील छोट्या रक्तनलिकांमध्ये अडकून राहतात. रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे प्राणवायूच्या कमतरतेने हळूहळू अवयव निकामी होऊ लागतात. यामध्ये लिव्हर, किडनी, मेंदू, फुफ्फुसे यांचा समावेश होतो. सेरेब्रल मलेरिया या प्रकारामध्ये फक्त मेंदूवर परिणाम होतो. अचानक भोवळ येणे, शुद्ध हरपणे, फेफरे येणे (एपिलेप्सी), पक्षाघात अशी लक्षण दिसून शेवटी माणूस कोमामध्ये जातो. आफ्रिका खंडात पाच वर्षाखालील मुलांना सेरेब्रल मलेरियाचा धोका खूप जास्त प्रमाणात आढळतो. बरेचदा आजार इतका बळावलेला असतो की औषधोपचार पण कामी येत नाहीत. म्हणूनच लवकर निदान खूप महत्वाचे असते. 

निदान

मलेरियाच्या निदानाची सर्वात जुनी आणि खात्रीशीर पद्धत म्हणजे मायक्रोस्कोपी. काचपट्टीवर रक्ताचा नमुना घेऊन लाल रक्तपेशींमधल्या पॅरसाईटचे मायक्रोस्कोपखाली निरीक्षण केले जाते. यासाठी रक्ताच्या नमुन्यावर रंगद्रव्यांची रासायनिक प्रक्रिया केली जाते. या पद्धतीद्वारे मलेरिया पॅरसाईट्सच्या वेगवेगळ्या प्रजातींचेपण निदान होऊ शकते. खालील फोटोत लाल रक्तपेशीतील पॅरासाईट्स (डावीकडे) आणि पेशी फोडून बाहेर पडणारे अनेक पॅरसाईट्स (उजवीकडे) दिसत आहेत. हि मलेरिया निदानाची सर्वात सोपी आणि स्वस्त पद्धत आहे.


फोटो स्त्रोत- वृषाली पाठक


रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट किंवा डिपस्टीक मेथडने खूप कमी वेळात (साधारण २० मिनिटे) मलेरियाचे निदान केले जाते. यामध्ये पॅॅरासाईटच्या चयापचय क्रियेतून बाहेर पडणारी प्रथिने, विकरे (Enzymes) यांचे मूल्यमापन केले जाते. पण याद्वारे पॅॅरासाईटची प्रजाती समजू शकत नाही.
पॉलिमरेझ चेन रिअॅक्शन (शृंखला अभिक्रिया) तसेच मॉलिक्युलर टेस्ट यांच्या साहाय्याने पण मलेरिया निदान केले जाते. या खूप क्लीष्ट आणि वेळखाऊ प्रक्रिया आहेत.   

उपचार

गंभीर व अवयवबाधित मलेरिया रुग्णांच्या उपचारासाठी हाॅस्पिटलच्या अतिदक्षता भागात निगराणीची आवश्यकता भासते. सौम्य प्रकारचा मलेरिया औषधांनी बरा होऊ शकतो.
क्लोरोक्वीन, हायड्रॉक्सी-क्लोरोक्वीन ही क्विनाईन गटातील औषधे प्राथमिक उपाययोजनेसाठी वापरली जातात. सध्या आर्टेमीसिनिन गटातील औषधे खूप प्रभावशाली मनाली जातात. खूप वर्षे सातत्याने त्याच औषधांचा वापर झाला तर पॅरासाईट्समध्ये या औषधांना प्रतिरोध (Resistance) विकसित होऊ शकतो. त्यामुळे WHO च्या नियमानुसार मलेरिया औषधांचा वापर समूहात केला जातो. दोन किंवा अधिक प्रकारची औषधे कॉम्बिनेशन मधे दिली जातात. या सर्वांची पॅरासाईटविरोधी कार्यप्रणाली वेगवेगळी असते.
(टिप- कोणतीही औषधे डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे हानीकारक आहे)
गेल्या काही वर्षात वाढलेल्या प्रतिरोधामुळे अधिकाधिक औषधसंशोधनाची गरज निर्माण झाली आहे. औषधनिर्मितीचा वेळ (साधारण १०-१२ वर्षे) वाचवण्यासाठी 'औषधांचे पुर्नव्यवस्थापन' ही आता काळाची गरज बनली अहे. याअर्तंगत एका आजारावरची औषधे  तपशीलवार अभ्यासानंतर दुसर्‍या आजारासाठी वापरली जाऊ शकतात. काही प्रतीजैविके (Antibiotics), कर्करोगची औषधे यांच्या मलेरियाविरोधी वापराबाबत संशोधन सुरू अहे. इमॅटिनीब आणि सोराफेनीब (कर्करोगाची औषधे) यांच्या मलेरियाविरोधी गुणधर्मांबद्दलचा माझा शोधनिबंध २०१५ साली प्रकाशित झाला होता. इमॅटिनीबची मलेरिया रुग्णांमधील उपयुक्तता समजून घेण्यासाठी जगभरात विविध ठिकाणी वैद्यकिय चाचण्या सुरू आहेत.

इच्छुकांसाठी माझ्या शोधनिबंधाची लिंक खाली देत आहे.
https://www.researchgate.net/publication/277968883_Tyrosine_Kinase_Inhibitors_New_class_of_antimalerials_on_the_horizon

मलेरिया नियंत्रणासाठी नविन कार्यक्षम औषधांची गरज तर आहेच पण त्याचबरोबर WHO च्या परियोजनेनुसार या रोगाच्या उन्मुलनासाठी वाहक म्हणजे डासांवर नियंत्रण तसेच प्रभावी लसीकरण ह्या गोष्टिपण तेवढ्याच आवश्यक आहेत. पुढिल भागात आपण भारताने अवलंबलेल्या त्रिसूत्री कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊ.

वृषाली पाठक (Ph.D.)

Friday, 10 April 2020

इन्नी आजी आणि मोदकांची आमटी

'इन्नी आजी' म्हणजे माझ्या आईची आई. खरं तर तिचा नाव विमल पण तिला इन्नी म्हणत असत. खूप गोड वाटायचं तिला इन्नी म्हणताना. ती होती पण तशीच; गोड आणि प्रेमळ!
तिचा नुसता उल्लेखही मला माझ्या बालपणात घेऊन जातो. सर्वप्रथम डोळ्यांसमोर येत ते म्हणजे गावचं घर, आगगाडीसारखं, एकापुढे एक अशा तीन खोल्यांच धाब्याचं घर आणि शेवटच्या खोलीत म्हणजे स्वयंपाकघरात ओट्यावर बसून पोळ्या लाटतांनाची आजीची मूर्ती. कंबरदुखीच्या त्रासामुळे आजी ओट्यावर बसून पोळ्या करायची. खूप गम्मत वाटायची मला त्याची. घरी परत आले की मी आईलाही ओट्यावर बसून स्वयंपाक करायला सांगत असे. रात्री धाब्यावर झोपताना आजी छान छान गोष्टी सांगायची. नक्षत्र, तारे दाखवायची. सप्तर्षी, मृगनक्षत्र, शुक्र, ध्रुवतारा यांच्याशी ओळख तिच्यामुळेच झाली. कोणतेतरी दोन तेजस्वी तारे दाखवून हे 'स्वर्गाचं दार' आहे असंही तिने सांगितलेलं मला आठवतं. माझ्या बालमनाला अचंबित आणि आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी तिच्याकडे होत्या. निरोप घेताना आजी दरवेळी हमखास रडायची. आपल्या लेकीची नातवंडांची परत कधी भेट होईल या विचाराने असेल बहुदा. आम्हाला कवटाळून अगदी करकचून पापी घ्यायची. अजकाल असा हळवेपणा क्वचितच बघायला मिळतो.
आजीच्या असंख्य संस्मरणीय गोष्टींपैकी प्रकर्षाने आठवण करून देणारी एक गोष्ट म्हणजे 'मोदकांची आमटी' हा पदार्थ. ही एक खान्देशी पाककृती आहे. मोदक म्हणजे गोडाचा पदार्थ या संकल्पनेला तडा देत तिखट सारण भरून बाहेरच्या आवरणाला मोदकाचा आकार देऊन ते आमटीत म्हणजे ग्रेव्हीत सोडले जातात आणि ग्रेव्हीपण अश्शी तिखट की खाणाऱ्याला खान्देशी दणका बसलाच पाहिजे. आजीच्या हातची नाकाडोळ्यातून पाणी काढणारी मोदकांची आमटी एकदम प्रसिद्ध होती. घरी आलेल्या पै-पाहुण्यांसाठी खूप कौतुकाने केली जायची. आजीपण खसखस खोबरं यासारख्या गोष्टींचा मुक्तहस्ते वापर करून मोठ्या कलाकुसरीने कळीदार मोदक बनवायची. झणझणीत आमटीत तरंगणारे मोदक म्हणजे पर्वणीच! तोंडचं पाणी पळणार हे माहित असूनही तोंडाला पाणी सुटायचं.
हे परंपरागत पाककौशल्य आजी आणि आईकडून माझ्याकडेपण थोडंफार हस्तांतरित झालं आहे. आजही एखाद्या निवांत रविवारी किंवा खास पाहुण्यांच्या आगमनानिमित्त माझ्या घरी ही आमटी केली जाते. तेव्हा आजीची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि मन परत भूतकाळात रमतं.

मोदकांची आमटी कशी बनवावी?

साहित्य 
अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं
१ कांदा
लसूण १०-१२ पाकळ्या
२ चमचे खसखस
खडा मसाला- दालचिनी, लवंग (४-५), मिरी (७-८), तेजपान (४-५)
१ वाटी कणिक
अर्धी वाटी बेसन
धने पावडर, जिरे पावडर, तिखट, हळद, मीठ, साखर, कोथिंबीर, तेल

कृती
# सर्वप्रथम खोबरं, कांद्याचे तुकडे, लसूण, खडा मसाला आणि खसखस वेगवेगळे परतून घ्यावे.
# खडा मसाल्याची बारीक पूड घ्यावी.
# खोबरं, कांदा आणि लसूण यांचेएकत्र बारीक वाटून घ्यावे.

मोदकांचे सारण
# २ चमचे तेलात खोबऱ्याच्या वाटणापैकी अर्धे वाटण परतून घ्यावे . त्यात भाजलेली खसखस, २ चमचे खडा मसाला पूड, २ चमचे तिखट, २ चमचे धणे पूड, १ चमचा जीरे पूड, १ चमचा हळद, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून मिसळून घ्यावे.
# शेवटी १ चमचा बेसन टाकून परतावे. पीठाने सरणाला चांगला मेळ येतो.

मोदक
# मोदकाच्या आवरणसाठी १ वाटी कणिक, २ चमचे बेसन, १ चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि १ चमचा तेल टाकून पीठ मळून घावे आणि त्याच्या जाडसर पुऱ्या लाटून घ्याव्या. पुऱ्या जाडसर लागल्याने मोदक फुटत नाहीत.
# पुऱ्यांमध्ये सारण भरून त्यांना मोदकाचा आकार द्यावा.

आमटी
# अर्धे उरलेले खोबऱ्याचे वाटण, १ चमचा खडा मसाला पूड, २ चमचे तिखट, १ चमचा धने पूड, १ चमचा हळद, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ टाकून तेलात चांगले परतून घ्यावे. आमटीसाठी खसखस आणि बेसन वगळता बाकी सर्व कृती सारखीच आहे.
# वाटण व्यवस्थित परतले गेले कि त्यात ३ वाट्या पाणी टाकून व्यवस्थित उकळून घ्यावे.
# बनवलेले मोदक उकळत्या आमटीत टाकून १० मिनिटे वाफवून घ्यावेत.
# वरून कोथिंबीर पेरून सर्व्ह करावे.


फोटो स्त्रोत- वृषाली पाठक  

इतिहासाचे साक्षीदार - एक्सप्रेसवे एडिशन

३ तासांचा प्रवास १६ तास लांबल्यावर जेव्हा अखेरीस घर जवळ येत तेव्हा पुलंच्या शैलीत "आपल्या पोटात एक चिमुकले भांडे आहे आणि त्यात जीव नावा...