पाँडिचेरी भेट श्री अरविंद आश्रम आणि ऑरोविल पाहिल्याशिवाय, त्यांचे कार्य जाणून घेतल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक अरविंद घोष अशीही एक श्री अरविंदांची ओळख आहे. जहाल क्रांतिकारक ते महायोगी हा त्यांचा जीवनप्रवास खूपच आगळा आहे. श्री अरविंद स्वतः त्यांची ओळख आधी एक कवी, मग क्रांतिकारक आणि शेवटी योगी अशी करून द्यायचे पण आजच्या घडीला जग त्यांना अगदी उलट क्रमाने ओळखते. बंगालच्या फाळणीनंतर त्यांचा राजकीय कार्यात सहभाग वाढला. वंगभंग चळवळीतून त्यांनी जाहीरपणे स्वात्रंत्र्यलढ्यात भाग घेतला. लोकमान्य टिळकांचे सहकारी बनून अनेक क्रांतिकार्यांमध्ये सहभागी झाले. खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी केलेल्या बॉम्बहल्ला प्रकरणात गोवले गेल्यामुळे त्यांना अलिगढ येथे कारावास भोगावा लागला. या सर्व काळामध्ये अरविंदांचा ओढा अध्यात्माकडे वाढला. इंग्रजांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ते पॉंडिचेरीमध्ये जाऊन राहिले आणि संपूर्ण निवृत्ती स्वीकारून योगसाधनेमध्ये स्वतःला झोकून दिले. पाँडिचेरी हीच त्यांची कर्मभूमी आणि योगभूमी ठरली.
चार पाच शिष्यांच्या साथीने १९२६ साली योग आणि अध्यात्मिक साधनेसाठी श्री अरविंद आश्रमाची स्थापना केली गेली. आता त्या आश्रमात अरविंदांची समाधी आणि ग्रंथालय सोडून बाकी काही नाही. काटेकोर शांतता पाळली जाते. एके दिवशी सकाळीच आम्ही आश्रमाला भेट द्यायला निघालो. मोबाईल बंद करून आम्ही आतमध्ये शिरलो; जुन्या वाड्यासारखे दुमजली बांधकाम, मध्यवर्ती अंगणाभोवती असलेला खोल्यांचा समूह आणि खोल्यांना लागून खांबांचा आधार देऊन बांधलेले सोपे/ व्हरांडे... विविध फुलझाडांनी सुशोभित केलेल्या मधल्या अंगणात एका वृक्षाखाली योगी अरविंदांची समाधी आहे. तेथेच एका पायरीवर बसून आम्ही ते दृश्य न्याहाळलं; एका चित्राप्रमाणे स्तब्ध आणि सुंदर.. थोडीजरी हालचाल झाली तर रसभंग होईल असं! संपूर्ण वातावरणात अध्यात्मिक, सकारात्मक ऊर्जा जाणवते आणि क्वचितच मिळणारी नीरव शांतता अनुभवायला मिळते. एका खोलीत अरविंदांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आहे. येथील ग्रंथालयात अरविंदांच्या विविध भाषांमधील, विविध विषयांची अनेक पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अरविंदांनी संपूर्ण मानवजातीच्या उत्कर्षासाठी तत्वज्ञान सांगितले; माणसाला सुख आणि समाधान बाह्य साधनांनी मिळू शकत नाही तर ते आतूनच यावे लागते असे अरविंदांना वाटायचे.
आश्रमाची स्थापना करताना त्यांना मिसेस मीरा अल्फासा (उत्तरआयुष्यातील श्रीमतीजी, The Mother) आणि त्यांचे पती पॉल रिचईस यांचा सहयोग लाभला. ऑरोविल ची संकल्पना आणि उभारणीमध्ये श्रीमंतीजींचे महत्वाचे योगदान आहे. अरविंदांचे तत्वज्ञान जागतिक पातळीवर नेऊन या प्रायोगिक वैश्विक नगरीची स्थापना केली आहे. ऑरोविल हे तामिळनाडूमधील विल्लूपुरम जिल्ह्यात (पॉंडिचेरीपासून सुमारे १० किमीवर) वसलेले यूनेस्कोसमर्थित आंतरराष्ट्रीय शहर आहे. येथे ५९ देशातील सर्व वयोगटाच्या विविध जातीधर्माचे, भाषांचे, संस्कृतीचे सुमारे २५०० नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. मानवता हाच धर्म. या शहराचा गाभा म्हणजे मध्यभागी उभारलेलं मातृमंदिर. हे एक योगसाधना किंवा प्रार्थनास्थळ आहे. दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो पर्यटक येथे भेट देतात. छोट्याश्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दाट झाडीतून साधारण दोन किलोमीटर पायपीट केल्यावर भव्य मातृमंदिराचे दर्शन घडते. बहिर्गोल सोनेरी तबकड्यांनी बनवलेली वैशिठ्यपूर्ण गोलाकार रचना, त्यावरून परावर्तीत होणारा सूर्यप्रकाश, हरखून जायला होते. या संपूर्ण परिसराचे व्यवस्थापन खूप छान केले आहे. बागबगीचे, मोठमोठाले वटवृक्ष, सागवानी लाकडाची झाडे यांची चोख निगराणी केली जाते. जागोजागी माहितीचे फलक लावले आहेत. वाटेतल्या माहितीकेंद्रात मातृमंदिरावर बनवलेली चित्रफीत पाहता येते. मातृमंदिराच्या आत असलेल्या इनर चेंबर मध्ये फक्त योगसाधकांनांच जायची परवानगी आहे. यांच्या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग करून आत ध्यानधारणेसाठी जात येते. ध्यान कक्षात ७० सेमी व्यासाचा एक क्रिस्टल ग्लोब स्थापन केला आहे. सूर्यप्रकाश डायरेक्ट ग्लोबवर पडेल अशा पद्धतीने रोज सूर्याच्या स्थानानुसार बाहेरील सोन्याच्या तबकड्या सरकवाल्या जातात आणि सूर्यप्रकाश त्या ग्लोबमधून इनर चेंबरमध्ये प्रतिबिंबित केला जातो. मला तर या भविष्यवेधी रचनेत काहीतरी गूढ/सुप्त हेतू असावा असे वाटायला लागले; खूप काल्पनिक विज्ञानकथा/ कादंबऱ्या वाचनाचा परिणाम असेल बहुदा!🙂🙂
मातृमंदिर परिसर
मानवी एकता प्रत्यक्षात उतरवणे हाच ऑरोविलचा उद्देश. कोणताही धर्म मनाला जात नाही, राजकारण नाही कारण सरकारच नाही, जेष्ठ मंडळीच शहराची धूरा सांभाळतात. पैशांचे व्यवहार नाहीत, यांचे स्वतःचे उद्योग, संशोधन संस्था आहेत. जगातील कोणीही व्यक्ती इथे राहू शकते, अट एकच ती म्हणजे येथे सेवक बनून राहणे!
येथे भेट देणाऱ्या प्रात्येकाच्या मनात निदान एकदातरी हा विचार नक्कीच येतो.
क्रमश: