Sunday, 15 May 2022

पॉंडिचेरी प्रवास गाथा- भाग ४

असं म्हणतात, "If there is magic on this planet, it is contained in water"  कोणताही जलाशय; मग नदी असो, खळाळता ओढा असो, धबधबा असो, शांत तलाव असो किंवा समुद्र.. या कोणत्याही ठिकाणी गेलं कि मन उल्हासीतच होतं! पण या सर्वांमध्ये समुद्राचं पारडं जरा जडच.. अथांग निळाई, क्षितिजाच्याही पलीकडे दूरवर पाणीच पाणी आणि उसळत्या लाटा; लांबूनच ती समुद्राची गाज ऐकली कि अधीरतेने पावलं झपझप आवाजाच्या दिशेने वळतात... 
समुद्रकिनारे नेहमीच आनंद देतात आणि त्यात भारताच्या पूर्व किनाऱ्यांची मजाच वेगळी. पूर्व किनारपट्टीच्या संथ उतारामुळे येथील समुद्रकिनारे खूपच कमी धोकादायक आहेत. लांबच लांब विस्तीर्ण, मऊसूत वाळूचे नयनरम्य किनारे, तरीपण तुलनेने कमी गर्दीचे..  त्यामुळे डुंबायला खूप मजा येते. पाँडिचेरी तर बीचेस साठी फारच प्रसिद्ध! प्रोमोनेड बीच, रॉक बीच, सेरेनिटी बीच, एडन बीच, ऑरोविल बीच.... पण या सर्वांमध्ये अतिशय सुंदर  म्हणजे पॅराडाईझ आयलंड बीच. 
नदीच्या बॅकवॉटरमुळे नैसर्गिकरित्या येथे एक बेट सदृश ठिकाण निर्माण झालं आहे. एका बाजूला नदी दुसऱ्या बाजूला समुद्र आणि मध्ये सोनेरी वस्त्रगाळ वाळूची पुळण.. अत्यंत आकर्षक आणि मोहक... 
चिन्नमवार बोटींग क्लब मधून येथे बोटीने जाता येते, हि सहल पण खूप निसर्गरम्य असते. आम्ही मात्र रस्त्याने मोठा वळसा घालून याठिकाणी गेलेलो. दोन मोठी रिसॉर्ट्स याबाजूने वसली आहेत. 'सॅण्ड ड्यून्स बीच' अशा नावाने ओळखला जाणारा हा बीच चा भाग! पार्किंग ची चांगली सोय आहे. माफक एन्ट्री फी देऊन आतमध्ये गेलो तर एकदम स्वच्छ परिसर, छोटे वळणदार पदपथ, जागोजागी फुलझाडं, दोन-तीन बैठी कार्यालयं, खूप साऱ्या चेंजिंग रूम्स, ओपन शॉवर, प्रसाधनगृह, उपाहारगृह... पर्यटकांचा विचार करून सर्व सोयीसुविधा उपलब्ध! नदीच्या बॅकवॉटर मध्ये ऍडव्हेंचर स्पोर्ट्स चा विभाग, दुसऱ्या बाजूला चेंजिंग रूम्सची आडवी ओळ ओलांडून पुढे गेलं कि सोनेरी रंगात चमकणारी वाळू आणि दुधाळ फेसाळत्या लाटांचा निळाशार बंगालचा उपसागर 😀
किनाऱ्यालगत पर्यटकांना विसाव्यासाठी मालदीव्हज् च्या धर्तीवर झावळ्यांपासून बनवलेले शॅक्स (झोपड्या) आहेत. बसायला बाकडी आहेत. बाजूला पाणी, शीतपेये, खाऊ विक्रेत्यांचे स्टॉल्स आहेत. आम्ही भरदुपारी पोहोचल्यामुळे उन्हाचा तडाखा जाणवत होता. तिथेच जरावेळ लाटांची गाज ऐकत बसलो. आमच्या अडीच वर्षाच्या ध्रुव चे वाळूत उद्योग सुरु झाले, ती मऊ हुळहुळणारी वाळू चौखूर उधळायचे काम एकाग्रतेने चालू झाले, हात, पाय, कपडेच नाही तर केस, कान सर्व वालुकामय झालेले. नंतर हॉटेल वर गेल्यावर त्याला नखशिखांत घासूनपुसून अंघोळ घतल्यावरच त्या वाळूपासून सुटका झाली. उन्हं उतरल्यावर पाण्यात जाऊ असं ठरवून उपाहारगृहाच्या दिशेने मोर्चा वळवला. त्या शंभर मीटर्सच्या वाळुप्रवासात पाय चांगलेच पोळून निघाले. चविष्ट खाद्यपदार्थांवर ताव मारत मस्त एक-दीड तास टाईमपास करून, कपडे बदलून आम्ही डुंबायला तयार झालो... अधीरतेने पाय त्या चमकणाऱ्या पाण्याकडे वळवले. लाटांचा पहिलाच स्पर्श मनाला सुखावून ताजातवाना करून गेला. हळूहळू आत उतरलो; गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत मग छातीपर्यंत लाटांवर लाटा आदळू लागल्या. मागे किनाऱ्याशी उभ्या असलेल्या आमच्या आयांच्या दटावणीला न जुमानता आम्ही डुंबत होतो. लाट अली कि त्यात सूर मारत होतो, (नसलेलं) पोहण्याचं कौशल्य आजमावत होतो, उगाचच पाण्यात डोकं टाकून श्वास रोखून धरत होतो, वरच्या जगाशी डिस्कनेक्ट होऊन पाण्याशी एकरूप होत होतो. 
ध्रुवशी दंगामस्ती करून करून बऱ्याच वेळाने नाईलाजानेच पाण्याच्या बाहेर पडलो. मग तो ओपन शॉवर खाली चिकटलेली वाळू धुऊन काढण्याचा सोपस्कार झाला. 
छान फ्रेश होऊन समुद्रकाठाने भटकंती करत निसर्गाची रंगपंचमी अनुभवू लागलो. समोर क्षितिजावर निळं पाणी आणि आकाश कुठे एक होतंय पत्ता लागत नव्हता. विरुद्ध दिशेला सूर्य अस्तास जात होता, पिवळ्या केशरी गुलाबी रंगांची उधळण चालू होती. एका ठिकाणी बीच बर्थडे पार्टी ची तयारी चालू होती. मनोमन 'किती नशीबवान व्यक्ती आहे' असं म्हणत कौतुकाने त्या वाळूत उभारलेल्या तंबूकडे आणि झुळझुळ उडणाऱ्या पडद्यांकडे न्याहाळत होतो.  आता उंट, घोडे यांच्या सावाऱ्या पण सुरु झाल्या होत्या. किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांची संख्या पण वाढल्याचे लक्षात आले. सर्वजण धकाधकीच्या जीवनातून मन:शांती साठी, विसाव्यासाठी, स्वात:मधे अथवा निसर्गामधे रममाण व्हायला आले होते. पाण्यातील जादू अनुभवत होते. 
काही वेळाने सूर्य पूर्णपणे मावळला आणि नभात फक्त गुलाबी छटा उरली. अत्यंत तृप्त मानाने आम्ही परत फिरलो आणि 'The Best Day in Pondicherry' असं  घोषित करून आमच्या हॉटेल वर परतलो.
क्रमश:

Sunday, 6 March 2022

पॉंडिचेरी प्रवास गाथा- भाग ३

पाँडिचेरी भेट श्री अरविंद आश्रम आणि ऑरोविल पाहिल्याशिवाय, त्यांचे कार्य जाणून घेतल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक अरविंद घोष अशीही एक श्री अरविंदांची ओळख आहे. जहाल क्रांतिकारक ते महायोगी हा त्यांचा जीवनप्रवास खूपच आगळा आहे. श्री अरविंद स्वतः त्यांची ओळख आधी एक कवी, मग क्रांतिकारक आणि शेवटी योगी अशी करून द्यायचे पण आजच्या घडीला जग त्यांना अगदी उलट क्रमाने ओळखते. बंगालच्या फाळणीनंतर त्यांचा राजकीय कार्यात सहभाग वाढला. वंगभंग चळवळीतून त्यांनी जाहीरपणे स्वात्रंत्र्यलढ्यात भाग घेतला. लोकमान्य टिळकांचे सहकारी बनून अनेक क्रांतिकार्यांमध्ये सहभागी झाले. खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी केलेल्या बॉम्बहल्ला प्रकरणात गोवले गेल्यामुळे त्यांना अलिगढ येथे कारावास भोगावा लागला. या सर्व काळामध्ये अरविंदांचा ओढा अध्यात्माकडे वाढला. इंग्रजांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ते पॉंडिचेरीमध्ये जाऊन राहिले आणि संपूर्ण निवृत्ती स्वीकारून योगसाधनेमध्ये स्वतःला झोकून दिले. पाँडिचेरी हीच त्यांची कर्मभूमी आणि योगभूमी ठरली. 
चार पाच शिष्यांच्या साथीने १९२६ साली योग आणि अध्यात्मिक साधनेसाठी श्री अरविंद आश्रमाची स्थापना केली गेली. आता त्या आश्रमात अरविंदांची समाधी आणि ग्रंथालय सोडून बाकी काही नाही. काटेकोर शांतता पाळली जाते. एके दिवशी सकाळीच आम्ही आश्रमाला भेट द्यायला निघालो. मोबाईल बंद करून आम्ही आतमध्ये शिरलो; जुन्या वाड्यासारखे दुमजली बांधकाम, मध्यवर्ती अंगणाभोवती असलेला खोल्यांचा समूह आणि खोल्यांना लागून खांबांचा आधार देऊन बांधलेले सोपे/ व्हरांडे... विविध फुलझाडांनी सुशोभित केलेल्या मधल्या अंगणात एका वृक्षाखाली योगी अरविंदांची समाधी आहे. तेथेच एका पायरीवर बसून आम्ही ते दृश्य न्याहाळलं; एका चित्राप्रमाणे स्तब्ध आणि सुंदर.. थोडीजरी हालचाल झाली तर रसभंग होईल असं! संपूर्ण वातावरणात अध्यात्मिक, सकारात्मक ऊर्जा जाणवते आणि क्वचितच मिळणारी नीरव शांतता अनुभवायला मिळते. एका खोलीत अरविंदांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आहे. येथील ग्रंथालयात अरविंदांच्या विविध भाषांमधील, विविध विषयांची अनेक पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  अरविंदांनी संपूर्ण मानवजातीच्या उत्कर्षासाठी तत्वज्ञान सांगितले; माणसाला सुख आणि समाधान बाह्य साधनांनी मिळू शकत नाही तर ते आतूनच यावे लागते असे अरविंदांना वाटायचे.
आश्रमाची स्थापना करताना त्यांना मिसेस मीरा अल्फासा (उत्तरआयुष्यातील श्रीमतीजी, The Mother) आणि त्यांचे पती पॉल रिचईस यांचा सहयोग लाभला. ऑरोविल ची संकल्पना आणि उभारणीमध्ये श्रीमंतीजींचे महत्वाचे योगदान आहे. अरविंदांचे तत्वज्ञान जागतिक पातळीवर नेऊन या प्रायोगिक वैश्विक नगरीची स्थापना केली आहे. ऑरोविल हे तामिळनाडूमधील विल्लूपुरम जिल्ह्यात (पॉंडिचेरीपासून सुमारे १० किमीवर) वसलेले यूनेस्कोसमर्थित आंतरराष्ट्रीय शहर आहे. येथे ५९ देशातील सर्व वयोगटाच्या विविध जातीधर्माचे, भाषांचे, संस्कृतीचे सुमारे २५०० नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. मानवता हाच धर्म. या शहराचा गाभा म्हणजे मध्यभागी उभारलेलं मातृमंदिर. हे एक योगसाधना किंवा प्रार्थनास्थळ आहे. दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो पर्यटक येथे भेट देतात. छोट्याश्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दाट झाडीतून साधारण दोन किलोमीटर पायपीट केल्यावर भव्य मातृमंदिराचे दर्शन घडते. बहिर्गोल सोनेरी तबकड्यांनी बनवलेली वैशिठ्यपूर्ण गोलाकार रचना, त्यावरून परावर्तीत होणारा सूर्यप्रकाश, हरखून जायला होते. या संपूर्ण परिसराचे व्यवस्थापन खूप छान केले आहे. बागबगीचे, मोठमोठाले वटवृक्ष, सागवानी लाकडाची झाडे यांची चोख निगराणी केली जाते. जागोजागी माहितीचे फलक लावले आहेत. वाटेतल्या माहितीकेंद्रात मातृमंदिरावर बनवलेली चित्रफीत पाहता येते. मातृमंदिराच्या आत असलेल्या इनर चेंबर मध्ये फक्त योगसाधकांनांच जायची परवानगी आहे. यांच्या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग करून आत ध्यानधारणेसाठी जात येते. ध्यान कक्षात ७० सेमी व्यासाचा एक क्रिस्टल ग्लोब स्थापन केला आहे. सूर्यप्रकाश डायरेक्ट ग्लोबवर पडेल अशा पद्धतीने रोज सूर्याच्या स्थानानुसार बाहेरील सोन्याच्या तबकड्या सरकवाल्या जातात आणि सूर्यप्रकाश त्या ग्लोबमधून इनर चेंबरमध्ये प्रतिबिंबित केला जातो. मला तर या भविष्यवेधी रचनेत काहीतरी गूढ/सुप्त हेतू असावा असे वाटायला लागले; खूप काल्पनिक विज्ञानकथा/ कादंबऱ्या वाचनाचा परिणाम असेल बहुदा!🙂🙂

मातृमंदिर

मातृमंदिर परिसर
महाकाय वटवृक्ष
मानवी एकता प्रत्यक्षात उतरवणे हाच ऑरोविलचा उद्देश. कोणताही धर्म मनाला जात नाही, राजकारण नाही कारण सरकारच नाही, जेष्ठ मंडळीच शहराची धूरा सांभाळतात. पैशांचे व्यवहार नाहीत, यांचे स्वतःचे उद्योग, संशोधन संस्था आहेत. जगातील कोणीही व्यक्ती इथे राहू शकते, अट एकच ती म्हणजे येथे सेवक बनून राहणे!
येथे भेट देणाऱ्या प्रात्येकाच्या मनात निदान एकदातरी हा विचार नक्कीच येतो.
क्रमश:

Sunday, 27 February 2022

पॉंडिचेरी प्रवास गाथा- भाग २

पॉंडिचेरी माझ्या दृष्टीने अजून एका कारणासाठी  महत्वाचे आहे, इथे JIPMER (Jawaharlal Institute of Postgraduate Medical Education & Research) नावाची खूप विख्यात वैद्यकशास्त्र संशोधन संस्था आहे. या संस्थेतील माझी सहयोगी आणि मी (NIIH, KEM Hospital) मिळून आमच्या PhD चे बरेच संशोधनकार्य एकत्रित केले आहे. विविध सेमिनार किंवा परिषदांमध्ये भेटल्यावर तिच्याकडून पॉंडिचेरीचे खूप वर्णन आणि गोष्टी ऐकल्या होत्या ज्या मनात घर करून राहिलेल्या. 
ढोबळमानाने पाँडिचेरी च्या इतिहासाचे तीन भाग पडतात; पुरातन, मध्ययुगीन आणि आधुनिक. या नगरीच्या क्षेत्रात 'वेदपुरी' वसलेली असावी असे मानतात. अगस्त्य ऋषींचा तिच्याशी संबंध असावा असे मानले जाते. साधारण चौथे ते पंधरावे शतक हा काळ पल्लव, चौल आणि पांड्य राजवटींचा होता. आधुनिक इतिहास सुरु होतो तो विजयनगर साम्राज्य आणि पुढे विजापूरकर सुलतानांच्या सत्तेपासून. पण पाँडिचेरीला खरी ओळख मिळाली ती सतराव्या शतकात, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी च्या काळात. हा प्रदेश महत्वाचे व्यापारी बंदर म्हणून उदयास आला. 
शिवाजी महाराजांच्या सुभेदारांनी कर्नाटक मोहिमेत पाँडिचेरी तात्पुरती जिंकली पण फ्रेंचांचे व्यापारी परवाने तसेच चालू ठेवले. राजाराम महाराज जिंजीला आल्यावर पाँडिचेरी मराठे आणि मुघल यांच्या कात्रीत सापडली. ती एका तहानंतर परत फ्रेंचांना मिळाली (१६९७) आणि वसाहत वाढीस लागली. पुढे गव्हर्नर जनरल ड्युप्लेक्स च्या काळात फ्रेंच सत्तेचा परमोत्कर्ष झाला. स्वातंत्र्यानंतर १९५४ साली हा प्रदेश भारतात विलीन झाला पण अजूनही पाँडिचेरीमध्ये फ्रेंच संस्कृतीचा खूप पगडा आढळतो.
महाबलीपूरमवरून निघाल्यावर आम्ही संध्याकाळपर्यंत मुक्कामी पोहोचलो. आमचं हॉटेल भरवस्तीत व्हाईट टाउन पासून अगदी १०-१५ मिनिटांवर होतं. व्हाईट टाउन हा पॉंडिचेरीचा किनाऱ्याजवळील अगदी आखीवरेखीव फ्रेंच कॉलनी चा भाग आणि पर्यटकांचं आवडतं ठिकाण! येथील फ्रेंच स्थापत्यकलेच्या इमारती, त्यांचा मोहक पिवळा, अबोली किंवा पांढरा रंग, जुने मोठे वाडे त्यांचे प्रशस्त अंगण, विशिष्ठ रचनेच्या बाल्कनीज त्यातून बाहेर डोकावणाऱ्या वेली... काहीकाळ आपण विसरूनच जातो कि भारतात आहोत. अगदी रस्त्यांची नवे आणि फलक पण फ़्रेंच भाषेत आढळतात. सरकारी कामकाजात पण काही प्रमाणात फ्रेंच भाषा वापरली जाते. फ्रेंच पाळेमुळे असलेली कुटुंबे आजही इथे राहतात. उगाच नाही पाँडिचेरी ला 'द लिटिल फ्रान्स ऑफ इंडिया' म्हणतात!  व्हाईट टाउन च्या परिसरातील विविध कॅफे, उपहारगृह आणि रेस्टॉरंट्समधे फ्रेंच पाककृतींचा आस्वाद घेता येतो. खवय्यांनी एकदातरी याठिकाणी भेट देऊन जिभेचे चोचले पुरवून घ्यावेत.
पाँडिचेरी चा USP म्हणजे इकडचा समुद्रकिनारा. खूप अप्रतिम समुद्रकिनारा, ज्याकडे तासंतास फक्त पाहतच राहावंसं वाटतं. लाटांच्या आवाजात, मऊसूत वाळूत चालत, खेळत वेळ कसा जातो कळतच नाही. याला प्रोमोनेड अथवा रॉक बीच असेही म्हणतात. किनाऱ्याला समांतर सरळसोट असलेला हा रस्ता पूर्णपणे वाहनविरहित आहे. या रस्त्यावरून वाहने, अगदी सायकल पण चालवायला परवानगी नाही. कसेही फिरा, रहदारी किंवा हॉर्न यांची पर्वा करायची काही गरज नाही. बीचच्या एका टोकाने फ्रेंच वॉर मेमोरियल पासून सुरुवात करून शेवटी ओल्ड पोर्ट पर्यंत दिड किलोमीटरचा मस्त मोकळा रस्ता... मधे भारती पार्क, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, फ्रेंच गव्हर्नर मार्कस ड्युप्लेक्स यांची स्मारके लागतात. 
आमच्या चार दिवसांच्या वास्तव्यात आम्ही रोज सकाळी समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारायला जायचो. समुद्राच्या क्षितिजापलीकडून उगवणाऱ्या सूर्यनारायणाला बघताना भान हरपून जाते. पश्चिम किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना हे दृश्य निराळंच..  योगायोगाने आम्ही गेलेलो तेव्हा माघ पौर्णिमा होती. पौर्णिमेच्या चांदण्यात चमकणाऱ्या लाटा अनुभवण्याचं सुख लाभलं आणि तामिळ लोकांचा माघ महोत्सव बघण्याची पण संधी मिळाली. या महोत्सवात कार्तिकस्वामी, श्रीगणेश, बालाजी महाराज, दुर्गादेवी यांच्या रथयात्रा निघतात आणि दिवसभर विविध प्रमुख रस्त्यांवरून फिरून परत मंदिरात विराजमान होतात. खूप लोकं दर्शनासाठी रस्त्यांवर उभी राहतात, छोट्या-मोठ्या मातीच्या घाडग्यात काहीतरी भोग चढवतात. सगळं शांतपणे, काही घाईगडबड किंवा ढकलाढकली नाही.
अशा या फ्रेंच तामिळ संस्कृतीचं मिश्रण असलेल्या शहराचे विविध पैलू आमच्यासमोर उलगडत होते.
क्रमशः

Friday, 25 February 2022

पॉंडिचेरी प्रवास गाथा

भाग १

बरंच पूर्वीपासून पॉंडिचेरी (आताचे पुदुचेरी) बकेट लिस्ट मध्ये होतं पण योग येत नव्हता. लहानपणापासूनच मला केंद्रशासित प्रदेशांबद्दल कुतूहल होतं, या ठिकाणांना वेगळा महत्व दिलंय भारत सरकारने. त्यात पाँडिचेरी सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्ट्या खूपच वेगळं.... 
हा केंद्रशासित प्रदेश चार विलग (एकमेकांपासून खूप दूर) जिल्ह्यांनी मिळून बनलेला आहे. पॉंडिचेरी आणि करैकल तामिळनाडू मध्ये तर यानम आंध्र प्रदेशात आणि माहे केरळमध्ये. या चारही प्रदेशात पूर्वी फ्रेंचांची वसाहत होती. १९५४ साली हे चार जिल्हे एक केंद्रशासित प्रदेश म्हणून भारतात विलीन झाले. आम्ही निघालो होतो पाँडिचेरी जिल्ह्यात, पूर्वेकडे बंगालचा उपसागर आणि बाकी तीनही बाजूंनी तामिळनाडूने वेढलेला प्रदेश.... 
पाँडिचेरी साठी रस्त्याने आणि ट्रेनने साधारण २४-३६ तास लागतात. उपलब्ध वेळ आणि कुटुंबातील सदस्यांची वये (२ वर्षे ते ६८ वर्षे) लक्षात घेऊन विमानानेच जायचे ठरवले. चेन्नई विमानतळ ते पाँडिचेरी १४५ किमी चे अंतर ३ तासात पार करता येते. ध्रुवाचा हा पहिलाच विमानप्रवास म्हणून आम्ही खूप उत्साही होतो. कोणत्याही विमानप्रवासातील दोन गोष्टी मला फार आवडतात; एक म्हणजे टेक ऑफ च्या वेळी विमानाचा वेग, साधारण १८० तशी किमी वेगाने विमान रनवे वर धावू लागते तेव्हा खूपच रोमांचक वाटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर विमान रात्रीचे असेल तर टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळी दिव्यांच्या प्रकाशात चमकणारे रस्ते आणि त्या प्रदेशाची (विशेषतः मुंबईची) आऊटलाईन.... 
आम्ही जाताना सकाळी लवकर आणि येताना संध्याकाळी उशिरा अशी विमानाची तिकिटे काढली होती म्हणजे येण्याजाण्याच्या दिवसाचा पण वेळ मिळाला. विमानाने साधारण दोन तासात आम्ही चेन्नईला पोहोचलो. आधीच ZoomCar अँपने कार निश्चित केली होती. त्यात बसून आम्ही निसर्गरम्य अशा ईस्ट कोस्ट रोडने (ECR) महाबलीपूरम च्या दिशेने निघालो. 
महाबलीपूरम हे चेन्नईपासून ५५ किमी अंतरावर, एक बाजूला बंगालचा उपसागर आणि दुसऱ्या बाजूला ग्रेट सॉल्ट लेक यामध्ये वसलेलं आणि दगडाच्या वास्तुशिल्पांसाठी प्रसिद्ध असं शहर आहे.पुरातन काळात हे एक महत्वाचे व्यापारी बंदर होते. पल्लव वंशातील पहिला राजा नरसिंहवर्मा याच्या महामल्ल किंवा मामल्ल या उपाधी वरून हे स्थळ मामल्लपूरम म्हणूनही ओळखले जाते. येथील जागतिक वारसा स्थळांचा (युनेस्को हेरिटेज साईट) मान मिळालेली, अखंड दगडात कोरलेली वास्तूशिल्प प्रेक्षणीय आहेत. 
पंच रथ मंदिर, अर्जुनाची तपश्चर्या/ गंगा अवतरण शिल्प हि प्रमुख शिल्प बघून आम्ही महाबलीपुरमच्या समुद्रकिनाऱ्यावरील शोअर टेम्पल (Shore temple) कडे मोर्चा वळवला. हा तीन मंदिरांचा समूह अगदी किनाऱ्यानजीकच घडवला आहे. २००४ सालच्या प्रलयकारी त्सुनामीला तोंड देऊन आजही हे शिल्प दिमाखात उभं  आहे.

पंच रथ मंदिर
 
शोअर टेम्पल
रणरणत्या उन्हात फोटो आणि सेल्फी काढत आमची भटकंती चालू होती. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याचाच काय तो आधार! बाजूने कुंपण असल्यामुळे समुद्र समोर दिसत असून सुद्धा फक्त नयनसुख घ्यावे लागले. महाबलीपुरमला सोनेरी वाळूचा सुंदर किनार लाभला आहे. वेळेअभावी बरीच शिल्प आम्हाला बघता आली नाहीत पण कृष्णा बटरबॉल, वराह मंदिर, गणेश मंदिर, दीपगृह ही  स्थळंपण आवर्जून भेट देण्यासारखी आहेत. सरत्या दुपारी आम्ही पाँडिचेरी च्या दिशेने परत ईस्ट कोस्टल रास्ता पकडला. 

इस्ट कोस्टल रोड
क्रमशः

इतिहासाचे साक्षीदार - एक्सप्रेसवे एडिशन

३ तासांचा प्रवास १६ तास लांबल्यावर जेव्हा अखेरीस घर जवळ येत तेव्हा पुलंच्या शैलीत "आपल्या पोटात एक चिमुकले भांडे आहे आणि त्यात जीव नावा...