तिचा नुसता उल्लेखही मला माझ्या बालपणात घेऊन जातो. सर्वप्रथम डोळ्यांसमोर येत ते म्हणजे गावचं घर, आगगाडीसारखं, एकापुढे एक अशा तीन खोल्यांच धाब्याचं घर आणि शेवटच्या खोलीत म्हणजे स्वयंपाकघरात ओट्यावर बसून पोळ्या लाटतांनाची आजीची मूर्ती. कंबरदुखीच्या त्रासामुळे आजी ओट्यावर बसून पोळ्या करायची. खूप गम्मत वाटायची मला त्याची. घरी परत आले की मी आईलाही ओट्यावर बसून स्वयंपाक करायला सांगत असे. रात्री धाब्यावर झोपताना आजी छान छान गोष्टी सांगायची. नक्षत्र, तारे दाखवायची. सप्तर्षी, मृगनक्षत्र, शुक्र, ध्रुवतारा यांच्याशी ओळख तिच्यामुळेच झाली. कोणतेतरी दोन तेजस्वी तारे दाखवून हे 'स्वर्गाचं दार' आहे असंही तिने सांगितलेलं मला आठवतं. माझ्या बालमनाला अचंबित आणि आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी तिच्याकडे होत्या. निरोप घेताना आजी दरवेळी हमखास रडायची. आपल्या लेकीची नातवंडांची परत कधी भेट होईल या विचाराने असेल बहुदा. आम्हाला कवटाळून अगदी करकचून पापी घ्यायची. अजकाल असा हळवेपणा क्वचितच बघायला मिळतो.
आजीच्या असंख्य संस्मरणीय गोष्टींपैकी प्रकर्षाने आठवण करून देणारी एक गोष्ट म्हणजे 'मोदकांची आमटी' हा पदार्थ. ही एक खान्देशी पाककृती आहे. मोदक म्हणजे गोडाचा पदार्थ या संकल्पनेला तडा देत तिखट सारण भरून बाहेरच्या आवरणाला मोदकाचा आकार देऊन ते आमटीत म्हणजे ग्रेव्हीत सोडले जातात आणि ग्रेव्हीपण अश्शी तिखट की खाणाऱ्याला खान्देशी दणका बसलाच पाहिजे. आजीच्या हातची नाकाडोळ्यातून पाणी काढणारी मोदकांची आमटी एकदम प्रसिद्ध होती. घरी आलेल्या पै-पाहुण्यांसाठी खूप कौतुकाने केली जायची. आजीपण खसखस खोबरं यासारख्या गोष्टींचा मुक्तहस्ते वापर करून मोठ्या कलाकुसरीने कळीदार मोदक बनवायची. झणझणीत आमटीत तरंगणारे मोदक म्हणजे पर्वणीच! तोंडचं पाणी पळणार हे माहित असूनही तोंडाला पाणी सुटायचं.
हे परंपरागत पाककौशल्य आजी आणि आईकडून माझ्याकडेपण थोडंफार हस्तांतरित झालं आहे. आजही एखाद्या निवांत रविवारी किंवा खास पाहुण्यांच्या आगमनानिमित्त माझ्या घरी ही आमटी केली जाते. तेव्हा आजीची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि मन परत भूतकाळात रमतं.
मोदकांची आमटी कशी बनवावी?
साहित्य
अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं
१ कांदा
लसूण १०-१२ पाकळ्या
२ चमचे खसखस
खडा मसाला- दालचिनी, लवंग (४-५), मिरी (७-८), तेजपान (४-५)
१ वाटी कणिक
अर्धी वाटी बेसन
धने पावडर, जिरे पावडर, तिखट, हळद, मीठ, साखर, कोथिंबीर, तेल
कृती
# सर्वप्रथम खोबरं, कांद्याचे तुकडे, लसूण, खडा मसाला आणि खसखस वेगवेगळे परतून घ्यावे.
# खडा मसाल्याची बारीक पूड घ्यावी.
# खोबरं, कांदा आणि लसूण यांचेएकत्र बारीक वाटून घ्यावे.
मोदकांचे सारण
# २ चमचे तेलात खोबऱ्याच्या वाटणापैकी अर्धे वाटण परतून घ्यावे . त्यात भाजलेली खसखस, २ चमचे खडा मसाला पूड, २ चमचे तिखट, २ चमचे धणे पूड, १ चमचा जीरे पूड, १ चमचा हळद, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून मिसळून घ्यावे.
# शेवटी १ चमचा बेसन टाकून परतावे. पीठाने सरणाला चांगला मेळ येतो.
मोदक
# मोदकाच्या आवरणसाठी १ वाटी कणिक, २ चमचे बेसन, १ चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि १ चमचा तेल टाकून पीठ मळून घावे आणि त्याच्या जाडसर पुऱ्या लाटून घ्याव्या. पुऱ्या जाडसर लागल्याने मोदक फुटत नाहीत.
# पुऱ्यांमध्ये सारण भरून त्यांना मोदकाचा आकार द्यावा.
आमटी
# अर्धे उरलेले खोबऱ्याचे वाटण, १ चमचा खडा मसाला पूड, २ चमचे तिखट, १ चमचा धने पूड, १ चमचा हळद, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ टाकून तेलात चांगले परतून घ्यावे. आमटीसाठी खसखस आणि बेसन वगळता बाकी सर्व कृती सारखीच आहे.
# वाटण व्यवस्थित परतले गेले कि त्यात ३ वाट्या पाणी टाकून व्यवस्थित उकळून घ्यावे.
# बनवलेले मोदक उकळत्या आमटीत टाकून १० मिनिटे वाफवून घ्यावेत.
# वरून कोथिंबीर पेरून सर्व्ह करावे.
फोटो स्त्रोत- वृषाली पाठक

Very nice
ReplyDeleteवरील प्रमाणात साधारण किती मोदक तयार होतात आमटी साठी?
ReplyDeleteHi,
Deleteते साधारपणे मोदकांच्या साईजवर अवलंबून आहे... मिडीयम आकाराचे ८-१० मोदक होऊ शकतात.