पॉंडिचेरी माझ्या दृष्टीने अजून एका कारणासाठी महत्वाचे आहे, इथे JIPMER (Jawaharlal Institute of Postgraduate Medical Education & Research) नावाची खूप विख्यात वैद्यकशास्त्र संशोधन संस्था आहे. या संस्थेतील माझी सहयोगी आणि मी (NIIH, KEM Hospital) मिळून आमच्या PhD चे बरेच संशोधनकार्य एकत्रित केले आहे. विविध सेमिनार किंवा परिषदांमध्ये भेटल्यावर तिच्याकडून पॉंडिचेरीचे खूप वर्णन आणि गोष्टी ऐकल्या होत्या ज्या मनात घर करून राहिलेल्या.
ढोबळमानाने पाँडिचेरी च्या इतिहासाचे तीन भाग पडतात; पुरातन, मध्ययुगीन आणि आधुनिक. या नगरीच्या क्षेत्रात 'वेदपुरी' वसलेली असावी असे मानतात. अगस्त्य ऋषींचा तिच्याशी संबंध असावा असे मानले जाते. साधारण चौथे ते पंधरावे शतक हा काळ पल्लव, चौल आणि पांड्य राजवटींचा होता. आधुनिक इतिहास सुरु होतो तो विजयनगर साम्राज्य आणि पुढे विजापूरकर सुलतानांच्या सत्तेपासून. पण पाँडिचेरीला खरी ओळख मिळाली ती सतराव्या शतकात, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी च्या काळात. हा प्रदेश महत्वाचे व्यापारी बंदर म्हणून उदयास आला.
शिवाजी महाराजांच्या सुभेदारांनी कर्नाटक मोहिमेत पाँडिचेरी तात्पुरती जिंकली पण फ्रेंचांचे व्यापारी परवाने तसेच चालू ठेवले. राजाराम महाराज जिंजीला आल्यावर पाँडिचेरी मराठे आणि मुघल यांच्या कात्रीत सापडली. ती एका तहानंतर परत फ्रेंचांना मिळाली (१६९७) आणि वसाहत वाढीस लागली. पुढे गव्हर्नर जनरल ड्युप्लेक्स च्या काळात फ्रेंच सत्तेचा परमोत्कर्ष झाला. स्वातंत्र्यानंतर १९५४ साली हा प्रदेश भारतात विलीन झाला पण अजूनही पाँडिचेरीमध्ये फ्रेंच संस्कृतीचा खूप पगडा आढळतो.
महाबलीपूरमवरून निघाल्यावर आम्ही संध्याकाळपर्यंत मुक्कामी पोहोचलो. आमचं हॉटेल भरवस्तीत व्हाईट टाउन पासून अगदी १०-१५ मिनिटांवर होतं. व्हाईट टाउन हा पॉंडिचेरीचा किनाऱ्याजवळील अगदी आखीवरेखीव फ्रेंच कॉलनी चा भाग आणि पर्यटकांचं आवडतं ठिकाण! येथील फ्रेंच स्थापत्यकलेच्या इमारती, त्यांचा मोहक पिवळा, अबोली किंवा पांढरा रंग, जुने मोठे वाडे त्यांचे प्रशस्त अंगण, विशिष्ठ रचनेच्या बाल्कनीज त्यातून बाहेर डोकावणाऱ्या वेली... काहीकाळ आपण विसरूनच जातो कि भारतात आहोत. अगदी रस्त्यांची नवे आणि फलक पण फ़्रेंच भाषेत आढळतात. सरकारी कामकाजात पण काही प्रमाणात फ्रेंच भाषा वापरली जाते. फ्रेंच पाळेमुळे असलेली कुटुंबे आजही इथे राहतात. उगाच नाही पाँडिचेरी ला 'द लिटिल फ्रान्स ऑफ इंडिया' म्हणतात! व्हाईट टाउन च्या परिसरातील विविध कॅफे, उपहारगृह आणि रेस्टॉरंट्समधे फ्रेंच पाककृतींचा आस्वाद घेता येतो. खवय्यांनी एकदातरी याठिकाणी भेट देऊन जिभेचे चोचले पुरवून घ्यावेत.
पाँडिचेरी चा USP म्हणजे इकडचा समुद्रकिनारा. खूप अप्रतिम समुद्रकिनारा, ज्याकडे तासंतास फक्त पाहतच राहावंसं वाटतं. लाटांच्या आवाजात, मऊसूत वाळूत चालत, खेळत वेळ कसा जातो कळतच नाही. याला प्रोमोनेड अथवा रॉक बीच असेही म्हणतात. किनाऱ्याला समांतर सरळसोट असलेला हा रस्ता पूर्णपणे वाहनविरहित आहे. या रस्त्यावरून वाहने, अगदी सायकल पण चालवायला परवानगी नाही. कसेही फिरा, रहदारी किंवा हॉर्न यांची पर्वा करायची काही गरज नाही. बीचच्या एका टोकाने फ्रेंच वॉर मेमोरियल पासून सुरुवात करून शेवटी ओल्ड पोर्ट पर्यंत दिड किलोमीटरचा मस्त मोकळा रस्ता... मधे भारती पार्क, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, फ्रेंच गव्हर्नर मार्कस ड्युप्लेक्स यांची स्मारके लागतात.
आमच्या चार दिवसांच्या वास्तव्यात आम्ही रोज सकाळी समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारायला जायचो. समुद्राच्या क्षितिजापलीकडून उगवणाऱ्या सूर्यनारायणाला बघताना भान हरपून जाते. पश्चिम किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना हे दृश्य निराळंच.. योगायोगाने आम्ही गेलेलो तेव्हा माघ पौर्णिमा होती. पौर्णिमेच्या चांदण्यात चमकणाऱ्या लाटा अनुभवण्याचं सुख लाभलं आणि तामिळ लोकांचा माघ महोत्सव बघण्याची पण संधी मिळाली. या महोत्सवात कार्तिकस्वामी, श्रीगणेश, बालाजी महाराज, दुर्गादेवी यांच्या रथयात्रा निघतात आणि दिवसभर विविध प्रमुख रस्त्यांवरून फिरून परत मंदिरात विराजमान होतात. खूप लोकं दर्शनासाठी रस्त्यांवर उभी राहतात, छोट्या-मोठ्या मातीच्या घाडग्यात काहीतरी भोग चढवतात. सगळं शांतपणे, काही घाईगडबड किंवा ढकलाढकली नाही.
अशा या फ्रेंच तामिळ संस्कृतीचं मिश्रण असलेल्या शहराचे विविध पैलू आमच्यासमोर उलगडत होते.
क्रमशः
No comments:
Post a Comment